Monday, February 16, 2009

तु असशीलही कदाचीत नसशीलही

तु असशीलही कदाचीत नसशीलही ..
एक ओळ असावी मात्र, तुझ्यासोबत लिहिलेली
कधीतरी नकोसं झाल की
खोल कुशीत घेणारी..

तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक श्वास असावा फक्त, तुझ्यासोबत घेतलेला
माझा बंद पडला तर
काळजामधुन वाहणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

एक स्पर्श असावा तुझा फक्त, हळुवार हातांचा
जगाने दिलेल्या जखमांवरुन
मलम होऊन फिरणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

एक दाद असावी तुझी फक्त, माझ्या कवितेला दिलेली
शब्दच सुचणार नाहीत तेव्हां
नवी आशा देणारी..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

पण आतुन एक हाक मात्र कायम असेन तुझी
काळीज चिरुन टाकणारा विरह असेनच तुझा
आणि त्या घावानंतरही
तुझ्यासाठी वाहणारी वेदना असेन..
तितकीच जिवंत आणी ताजी.. तुझ्या स्पर्शासारखी
आणी मागे असेन मी, पण तेव्हा
तु असशीलही कदाचीत नसशीलही

- अनामिक

Thursday, February 12, 2009

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"

मी नसेन तर
ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"


************ ********* *********

तिचे बोलणे ऐकून तो जरा... अस्वस्थ झाला. त्याच्या चेहे-यावरचा तो भाव तिला काही निराळाच भासला. क्शणातच त्याचा राग गायब झाला होता. त्याच्या डोळ्यातच तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले... हसून त्याने तिला विचारले.....आता तुझी पाळी....

तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर....
आता तू सांग कशी जगशील??
हाताच्या रेषांमध्ये कोणाचे नाव शोधशील?
आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील?
खिडकीत लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील?
कोणाला आपल्या गप्पांमध्ये गुंतवशील?

एकाकीपण जेव्हा खायला येईल,
निरभ्र आभाळ जेव्हा अचानक भरून येईल,
गड्गडाटाने जेव्हा सौदमिनी गरजेल....
तेव्हा सांग कोणाला बिलगशील??

गप्पांचा ओघ ओसरू लागताच..
तू नकळत काही बोलून जाताच...
सांग स्वत:ला कशी आवरशील?
जखमी मनाला कशी सावरशील?

चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहताना
कोणाच्या आठवात गढशील?
सुखाच्या आठवानेही तू
टपोरे अश्रू पाघळशील...
एकटीच स्फ़ुंदत बसशील..
किती वेळ तरी....

मैत्रिणींना एका "मैत्रिणीची" गोष्ट सांगताना.......
तू हळवी होशील...रडशील.
आठवशील फक्त मला...
बाकी सारे विसरशील.

माझी जाणीव हवा तुला करून देईल,
माझा भास छाया तुला करून देईल,
पाहशील जेव्हा झोपाळा एकाकी झुलताना,
माझा आभास श्वास तुला करून देईल,

लक्श कुठेही लागणार नाही,
चंचल चित्त स्थिरावणार नाही
स्वत:चे अश्रू कसोशीने तू दडशील,
मनात मला लपवून "नोर्मल" जगशील,
तुझ्या मनाचा रिक्तपणा कोणालाही कळणार नाही,
तू असेच दिवस रेटत जाशील...
सांग काय करशील?

तिच्या गोंधळलेल्या चेहे-यावर कोरलेले उत्तर त्याला उमजले..........
आणि त्यांचे ते भांड्ण...... असेच विरून गेले!!!

-अनामिक

Monday, February 9, 2009

तू तेव्हा तशी. तू तेव्हा अशी

तू तेव्हा तशी...
तू तेव्हा अशी...


तू माझ्या आयुष्याची पहाट॥
तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..
तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..
तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..
तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..
तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या असण्याचा अंश अंश..
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश..

-सुरेश भट.

Friday, February 6, 2009

आल्या आल्या म्हणतेस

आल्या आल्या म्हणतेस
आता
पुन्हा कधी जाणार नाही

जाता जाता म्हणतेस
आता
पुन्हा कधी येणार नाही

येणं जाणं कुणास ठाऊक
घडेल कसं ?
वा-यावरती तरंगणारी
सारीच पिसं

नसतानाही भरपूर असतेस
एवढं तुला कळणार नाही॥


-कुसुमाग्रज

Wednesday, February 4, 2009

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी
आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे..
ओथंबल्या क्षणांचे
हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी..
रंगली फ़ुगडी बाई रानात रानात
वाजती पॆंजण बाई तालात तालात
फ़ांदीवरला झोका उंच उंच गं झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी..
पावसातले दिवस अपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऎकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी
अजूनीच त्या ठिकाणी ती श्रावणओली गाणी
माझी तुझी कहाणी..

गीत: अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : सुरेश वाडकर
अल्बम : तेजोमय नादब्रम्ह

ऋतू हिरवा

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण,
प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन,
भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू,
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा

गीत : शांता शेळके
संगीत : श्रीधर फ़डके
गायिका : आशा भोसले
अल्बम : ऋतू हिरवा

Monday, February 2, 2009

चाफ्याच्या झाडा..

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....
चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

- पद्मा गोळे.