Showing posts with label मंगेश पाडगावकर. Show all posts
Showing posts with label मंगेश पाडगावकर. Show all posts

Tuesday, June 19, 2012

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी

काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी

दुःख नको सुटताना, अश्रू नको वळताना
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी

साक्ष लाख तार्‍यांची, स्तब्ध अचल वार्‍याची
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी
 
- मंगेश पाडगावकरगायिका : सुमन कल्याणपूरकर  

भेट तुझी माझी स्मरते

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
 
- मंगेश पाडगावकरसंगीत : यशवंत देव 
गायक : अरुण दाते  

सावर रे..

सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला

आता आभाळ भेटले रे, अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती, श्वास माझे मला

फांदी झोक्याने हालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला

जुने आधार तुटले रे, तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या, वेडया तुझ्या फुला
 
- मंगेश पाडगावकरगायिका : लता मंगेशकर 
संगीत : हृदयनाथ मंगेशकर  

जेव्हा तुझ्या बटांना ..

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा

मंगेश पाडगावकर
गायक : सुरेश वाडकर
संगीत : श्रीनिवास खळे 

Wednesday, April 11, 2012

छोरी

थबकुनी थोडी
वळुनी पुढे घाईनें
प्रौढ नि बुटक्या झाडाजवळुन जास्वंदीच्या
जाते वाट पुढे ही शाळेपाशी

शाळा:
चौकॊनी खॊकेच ४ खिडक्यांचे
रंग सफेद चुन्याचा
छप्पर लाल नळ्यांचे…

भल्या पहाटे (आठ वाजता)
झाडांचीही नसते जेंव्हा झोप संपली
सुरु व्हायची शाळा …….

पहिली घंटा….
दुसरी घंटा……..
सुरु प्रार्थना आणि नंतर:
“नमन तुला गणराया
बुद्धी जाग्रुती देई मुलां या”
….एक जांभई.

कर्कष्य आवाजाने नंतर हुकुम व्हायचा:
“काढा पाट्या
कुठे उजळणी
चला दाखवा…..”

…माझी पाटी कोरी…
हात पुढे….
भिंगे खवचट चष्म्याची रोखुनिया बघती
वेत सपासप माझ्या हातांवरती…

किती वेळ रडलो नाही ठाऊक
आली अवचीत जाग स्पर्शता हात मऊ
मी पाहिले शेजारी;
नविन कोणी मुलगी

केस भुरे सोनेरी
निळसर डोळे…….
मी विचारले तिज, “नांव काय तुझे….”
ती खट्याळ हसली आणि म्हणाली

“नांव? छोरी ….हात पुढे कर.”
आणि नजर खॊडकर
आणिक माझ्या हातावरती …दुखर्या हातावरती .
चिमणिच्या नाजुक दातांनी तोडियली
फोड एक कैरीची….

फोड एक कैरीची;
अजुन ताजी
जिभेवर जिची आंबट गोडी,
भुरभुरती सोनेरी कुंतल,
अजुन घेते टिपुनी वेदना
नजर तिची ती निळी खॊडकर…..
गिरकी घेते मनीं कलाबुत तिच्या स्वरांची;
“नांव? छोरी…. हात पुढे कर”

– मंगेश पाडगांवकर. १०-१०-१९५३

Thursday, January 6, 2011

संवाद

उन्हे ओली
सांज भोळी
डोळे डोळ्यांचे मागणे

कळलेले
जुळलेले
मौन फुलांचे सांगणे

नभ भोर
चंद्रकोर
जळी आभाळ वाहते

कुणी तरी
कुठे तरी
उगी जीवास भावते

-मंगेश पाडगावकर
२६.२.१९७१

Saturday, January 31, 2009

सांगा कस जगायचं?

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

-मंगेश पाडगावकर.

संथ निळे हे पाणी


संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा

दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी

भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा

किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी

मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही

हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मओनाचा गाभारा


- मंगेश पाडगावकर