Showing posts with label प्रसाद कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label प्रसाद कुलकर्णी. Show all posts

Sunday, May 24, 2009

मी तिच्याशी अबोला धरतो तेव्हा...


निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
आता येईल फोन तिचा ’बोलत का नाहीस?
एसेमेसला माझ्या उत्तर पाठवत का नाहीस?
तुझं गाणं तुझे शब्द वेडं करतात मला!
झालं गेलं विसर आणि सोड ना अबोला!’
काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिची बडबड
तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड
मीही तिच्यात गुंतलो होतो आता कळ्तं मला
तिचं नसणं कण कण जाळत असतं मला
तिलासुध्दा तिथे आता हाच विचार स्मरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
अन एकाएकी लागेल उचकी येईल तिचा फोन
मी सुध्दा हॅलो म्हणेन विसरून माझं मौन
तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले
’का रे छळ्तोस असा माझे श्वास थांबलेले’
दोघांमधलं अंतर आता वारयासारखं सरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
-प्रसाद कुलकर्णी

Saturday, January 31, 2009

अशीच यावी वेळ एकदा - प्रसाद कुलकर्णी

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले.

- प्रसाद कुलकर्णी