Showing posts with label शान्ता शेळके. Show all posts
Showing posts with label शान्ता शेळके. Show all posts

Tuesday, June 19, 2012

गणराज रंगि नाचतो

गणराज रंगि नाचतो
पायी घागर्‍या करती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो

कटी पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन, नर्तनास करी 
तुंदिल तनु तरी चपल साजिरी
लावण्ये साजतो

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणा वादन
ब्रम्हा धरितो, तालही रंगुन
मृदंग धीमी वाजतो

देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो
 
- शान्ता शेळके  
गायिका :लता मंगेशकर
संगीत : हृदयनाथ मंगेशकर 



 

घन राणी

घन राणी, साजणा
मी कशी तुझ्यासवे चुकले वाट रे, सांग ना

भिरभिर वार्‍याची, थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी, मनभर गाण्याची
तरी बाई सूर नव नवे
सुखद मधूर वाटतात हवे, यौवना

मधूमय समय असा, बहरुन कुंज हसे
तरळत गंध नवा, वय ते लावी पिसे
इथे तिथे गोड निळेपण
बावरते मन साद घाली कोण, यौवना

किती अधीर, अधीर भाषा प्रीतीची
मन माझे, मन माझे
मन बोलत नाही ग माझे
किती लाजे, किती लाजे
वेडे लाजरे मन गं माझे
एक शपथ, शपथ त्याला भितीची
हृदया रे, अदया रे, बोल ना
 
- शान्ता शेळके  
गायिका : आशा भोसले
संगीत : श्रीधर फडके  

ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले

ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची

डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले

स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले

हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले
 
- शान्ता शेळके 
गायिका : अनुराधा पौडवाल 
संगीत : श्रीधर फडके  

तोच चंद्रमा नभात

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

नीरवता ती तशीच, धूंद तेच चांदणे
छायांनी रेखियले, चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहीनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे
मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे
ती न असता उरात, स्वन ते न लोचनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरातुनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी
 
- शान्ता शेळके 
संगीतकार,गायक:सुधीर फडके.