Showing posts with label ग. दि. माडगुळकर. Show all posts
Showing posts with label ग. दि. माडगुळकर. Show all posts

Wednesday, June 24, 2009

चंद्र आणखी प्रिती यांचे काय

चंद्र पाहता सय प्रितीची तरुण मना का येते ?
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग कलावती तू, तुला असावी अचूक तयाची जाण ग
अन्‌ प्रीतनगरचा राजा मन्मथ, चंद्र तयाचा प्रधान ग !
अग प्रीत नगरची प्रजा तयाच्या मुजऱ्यासाठी येते
अन्‌ प्रधान साक्षी ठेवून राणी आण प्रितीची घेते

तोंडावरती जडे काळीमा, झिजते ज्याची कला कला
तो मदनाचा मंत्री कैसा समजून सांगा तुम्ही मला ?
गुरुपत्नीशी पाप करी हा, शाप बाधला याते
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग चंद्र उगवता समुद्र उसळे चढती डोंगर लाटा
अन्‌ तो देखावा प्रीतरसाचा शाहीर म्हणती मोठा
अग नभ धरणीचे अंतर त्यांच्या प्रीतिने तुटते
अन्‌ चंद्र आणखी प्रिती यांचे तूच ठरव गे नाते !

लाटा उठती सागरात ज्या, त्या तर त्याच्या लेकी
चंद्र-लहरींची प्रीत जोडिती त्यांची फिरली डोकी !
सखी बहिण अन्‌ सख्या भावाची प्रीत कधी का होते ?
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग चंद्र कसा ग होईल भाऊ उगाच सागर लाटांचा ?
अन्‌ आधारासी दाव पुरावा नको धिटावा ओठांचा !

देव-दानवी समुद्र मंथन पुराणांतरी केले ना !
मंथनात त्या रत्न चंद्रमा उसळून वरती आले ना !
जन्म पावला सागर पोटी तो तर त्याचा बेटा
त्याच सागरी जन्मतात ना निळ्या उसळत्या लाटा !

अहो बहिण-भाऊ याहुन कुठले चंद्र-लहरिंचे नाते ?
चंद्र पाहता सय प्रितीची तरूण मना का येते ?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले, विठ्ठल शिंदे
चित्रपट - सांगते ऐका (1959)

Monday, April 6, 2009

एका तळ्यात होती


एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे 
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे 
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक 
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? 
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक 
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले 
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले 
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक 
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक