Showing posts with label शांता शेळके. Show all posts
Showing posts with label शांता शेळके. Show all posts

Tuesday, June 19, 2012

ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले

ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची

डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले

स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले

हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले
 
- शान्ता शेळके 
गायिका : अनुराधा पौडवाल 
संगीत : श्रीधर फडके  

Wednesday, February 4, 2009

ऋतू हिरवा

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण,
प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन,
भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू,
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा

गीत : शांता शेळके
संगीत : श्रीधर फ़डके
गायिका : आशा भोसले
अल्बम : ऋतू हिरवा

Saturday, January 31, 2009

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली

त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती

पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुक्ष्म वास
ओळखीची... अनोळखीची...
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन... एक मन...

खसहिन्यात माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला

पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन

मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा..


- शांता शेळके