Showing posts with label मंगेश पाडगांवकर. Show all posts
Showing posts with label मंगेश पाडगांवकर. Show all posts

Tuesday, June 19, 2012

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी

काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी

दुःख नको सुटताना, अश्रू नको वळताना
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी

साक्ष लाख तार्‍यांची, स्तब्ध अचल वार्‍याची
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी
 
- मंगेश पाडगावकरगायिका : सुमन कल्याणपूरकर  

भेट तुझी माझी स्मरते

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
 
- मंगेश पाडगावकरसंगीत : यशवंत देव 
गायक : अरुण दाते  

सावर रे..

सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला

आता आभाळ भेटले रे, अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती, श्वास माझे मला

फांदी झोक्याने हालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला

जुने आधार तुटले रे, तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या, वेडया तुझ्या फुला
 
- मंगेश पाडगावकरगायिका : लता मंगेशकर 
संगीत : हृदयनाथ मंगेशकर  

जेव्हा तुझ्या बटांना ..

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा

मंगेश पाडगावकर
गायक : सुरेश वाडकर
संगीत : श्रीनिवास खळे 

Thursday, January 6, 2011

हाक

 गूढ निळी घनराई,
अन टपोर चंद्रमा वरी,
घालीत मी हाका तुला
तू नाही जवळी तरी

गूढ निळी मनराई;
हाक तुला आत आत,
तुज साठी रात्र जळे
डोळ्यातील बाहुल्यांत.

हाकेवर चंद्र असा,
हाकेवर रात्र अशी,
नसून तू जवळ कशी,
डोळ्यावर पापणीशी!

- मंगेश पाडगावकर
०५/०७/१९६५

Friday, February 20, 2009

एकदा केंव्हा तरी

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,
आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥


-मंगेश पाडगांवकर

Saturday, January 31, 2009

आनंदयात्री

अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

-मंगेश पाडगांवकर

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर्‌ भिर्‌ भिर्‌ भिर्‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

- मंगेश पाडगांवकर

पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा

पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा

मी बाई फुलराणी, गाईन सुंदर गाणी
फुले भरा भरा वेचा, आता खेळा नाचा

फूलपाखरू आले, मला हळूच म्हणाले
“तू राजा रानाचा !”, आता खेळा नाचा

कानी सुंदर डूल, तसे डुलते फूल
झुले झुला पानाचा, आता खेळा नाचा

थेंब दवाचे करती, चमचम गवतावरती
नजराणा किरणांचा, आता खेळ नाचा

- मंगेश पाडगांवकर

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?

-

जिप्सी

एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

आठवतें बालपण जेव्हां होतों मी खेळत
होतों बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौलें पानांचीं घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवतें अजूनहि होतों रंगत मी किती !
पण अकस्मात होतों जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

शाळेंतले ते दिवस पाटी-पुस्तक हातांत
टोपी जरीची सुंदर … स्वारी निघाली थाटांत
जाड काचेची चाळिशी लावूनिया डोळ्यांवर
होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतींच्या जगांत
उडे खिडकीमधून दूरदूरच्या ढगांत
झाडें पानांच्या हातांनीं होतीं मला बोलवीत
शेपटीच्या झुबक्यानें खार होती खुणवीत
कसें अवरावें मन ? गेलॊं पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

आणि पुढें कशासाठीं गेलॊ घर मी सोडून !
सारीं सारीं सुखे होतीं, काही नव्हतेंच न्य़ून
पण खोल खोल मनीं कूणी तरी होतें द:खी
अशा सुखांत असून जिप्सी उरला असुखी
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढें खळखळणार्या लाटा …
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

कधीं कधीं पहाटते उरीं आगळी प्रतीती
जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपतें चित्तीं
जाचूं लागते जिप्सीला द्न्यात विश्वाची चौकट
आणि जाणवतें काहीं गूढ … अंधुक … पुसट !
खेळ सांडिलेला सारा पुन्हा उधळाया सजे
आपणच निर्मिलेलें आपणच मोडूं धजे
गुढ अद्न्यात धुक्यांत आणि जातसे बुडून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

घर असूनहि आतां घर उरलेलें नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावें ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

(जिप्सी) -मंगेश पाडगांवकर


कळणे

मी तुला कविता दिली वाचायला
आणि तुला विचारलं , “कशी वाटली?”
तु, म्हणालीस, ’यातलं मला काहीसुध्दा कळलं नाही”

चकित होऊन मी तुला म्हणालो,
“काही सुध्दा कळलं नाही? मग आता असं कर,
खिडकीतुन या समोरच्या झाडाकडे पहा;
झाडाला फुलांनी घट्ट मिठी घातली आहे”

तु म्हणालिस, “पाहिलं. मग आता”
मी म्हणालॊ, “फुलांनी मीठी घातलेलं झाडं तुला कळलं,
मग आता माझ्या ह्या कवितेत
कळलं नाही असं काहिच उरलं नाही.”

(आनंद ऋतु ) -मंगेश पाडगांवकर.

सलाम

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्‍याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.

वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्‍केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्‍यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धध्यांच्या मलकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,

चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोशणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वचाणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदलेजाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील ः
म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या मझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.

मंगेश पाडगांवकर

श्रावणात घन निळा बरसला

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा

जागुनि ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा

- मंगेश पाडगांवकर

लाजून हासणे अन्‌

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे

-मंगेश पाडगांवकर

आणायचा, माझ्या ताईला नवरा आणायचा

“आणायचा, माझ्या ताईला नवरा आणायचा !”
“नको बाई नको, मला नवरा नको.”

“त्याचं खप्पडच नाक, त्याच्या पाठीला बाक,
दोन्ही डोळ्यांनी चकणा शोधायचा !
माझ्या ताईला नवरा आणायचा !”

“माझ्या दादाला बायको आणायची !”
“नको बाबा नको, मला बायको नको.”

“लाटणं तिच्या हाती, लागे तुझ्या पाठी
भोपळा टुणुक टुणुक तशी चालायची.
माझ्या दादाला बायको आणायची !”

“माझ्या ताईला नवरा आणायचा !
घट राहील अशा, मोठ्या दाढी-मिशा
बायको उडून जाईल असा घोरायचा.
माझ्या ताईला नवरा आणायचा !”

“माझ्या दादाला बायको आणायची !
तिचा घसा कसा ? गाढव गाई तसा.
लाडे लाडे तुझ्याशी बोलायची.
माझ्या दादाला बायको आणायची !”

- मंगेश पाडगांवकर.

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करत येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चूकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात ती
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लगतात
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !

लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं :
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं

म्हणणारी मणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणस भेटतात !
असाच एकजण चक्क मला म्हणाला :
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी प्रेमबिम कधीसुध्दा केलं नाही !
आमचं काही नडलं का ? प्रेमाशिवाय अडलं का ? “
त्याला वाटलं मला पटलं;
तेव्हा मी इतकचं म्हटलं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं अगदी ‘सेम’ नसतं !

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाल्लं असेल गोडीने
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासनतास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल.
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतं सुध्द, निळं चांदणं सांडतं सुध्दा,
दोन ओळींची चिठ्ठीसुध्दा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुध्द प्रेम असतं.

बोलगाणी - मंगेश पाडगांवकर

यांचं असं का होतं कळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

निळं निळं वेल्हाळ पाखरु
आभाळात उडणार;
रुपेरी वेलांटी घेत
मासा पाण्यात बुडणार!

याचं सुख नसतंच मुळी
कधी यांच्या साठी!
एकच गोष्ट यांची असते;
कपाळावर आठी!!

कधी सुध्दा यांची पापणी ढळत नाही!
यांचं असं का होतं कळतं नाही,
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

मोठ्यानं हसा तुम्ही;
यांना नैतिक त्रास होतो!
वेलची खाल्लीत तरी ह्यांना
व्हीस्की चा वास येतो!!

यांचा घॊशा सुरु असतो:
अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं,
त्मकं मुळिच पिऊ नका,
त्याने पडसं होतं!!

संयमाचे पुतळेच हे!
यांचं नम चुकुनही चळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

सगळेच कसे बागेमधे
व्यायाम करत असणार?
किंवाअ हातात गिता घेउन
चिंतन करित बसणार?

बागेतल्या कोपऱुयात किणी
घट्ट बिलगुन बसतंच नां?
गालाला गाल लाउन
गुलु गुलु करित असतंच ना?

असं काही दिसलं की
यांचं डॊकं सणकलंच!
यांच्या अध्यात्माचं गळू
अवघड जागी ठणकलंच!!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या
वेगवान घोडं असतं:
पण यांना मुलं होतात
हे एक कोडंच असतं!!

या कठीण कोड्य़ाचं उत्तर मात्र मिळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

कसल्याही आनंदाला
हे सतत भित असत्त:
एअरंडॆल प्यावं तसं
आयुष्य पीत असतात!

एरंडॆल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार?
एकच क्षेत्र ठरलेलं !
दुसरीकडे कुठे जाणार?

कारण आणि परिणाम
यांचं नातं टळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

-मंगेश पाडगांवकर.

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं……..

तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवून झालं ?
देणार काय ? घेणार काय ?
हुंडा किती ,बिंडा किती ?
याचा मान , त्याचा पान
सगळा मामला रोख होता ,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं ,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

मग एक दिवस,

चंद्र, सूर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणार्‍या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येऊन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं

(बोलगाणी )-मंगेश पाडगांवकर

या जन्मावर

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे.


-

मंगेश पाडगांवकर