Monday, April 6, 2009

एका तळ्यात होती


एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे 
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे 
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक 
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? 
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक 
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले 
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले 
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक 
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक


Friday, April 3, 2009

मन उधाण वाऱ्याचे


मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते…

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहूरत्या सांजेला कधी एकटेच झुरते..
सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते…
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते..
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते………… …..

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते…

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागून पळते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते………… 

Thursday, March 19, 2009

फोटोतली तरुणी

माज्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा माला म्हणाली
"मला चा़गलेसे स्थळ शोधून द्या ना..."
"इथे माजा जीव टा़़गल्या सारख वाटतय .."


- पु.ल.देशपांडे

प्रश्न


आताशा बुडणाऱ्या सुर्याला
"बरय उद्या भेटू "
अस म्हणालो की
मला म्हणतो ,
कशावरून
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे? "

सूर्य आता म्हातारा झालाय.


- पु.ल.देशपांडे

Wednesday, March 18, 2009

कणा


'ओळखलत का सर मला'
--पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी।
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून:
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भींतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली--
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे उरले--
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे.चिखलगाळ काढतो आहे.'-
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला--
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

Thursday, March 12, 2009

प्रीतीची वाट नेहमीच जात असते अथांग जळातून
वाळूवरच्या पावलांनी तिचा माग लागत नसतो..

पण एकेक पापुद्रा निघत जातो.. तसतसे त्या रेशमी नात्यातील पदर उलगडत जातात.. यात 'मी' पणाचेही बंधन कधीतरी गळून पडते.....

जवळपणात होतो दूर आता दुरून झालो जवळ
म्हणू नकोस जाणूनबुजून मीच माया केली पातळ

तशी आठवण येत नाही भेटीचीही काय जरूर ?
सूर वाहे ऊर भरुन घरांत देखील चांदणे टिपूर

इतके दिवस हसत रुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळते खोल खोल माझ्याच दॄष्टीत मिटली आहेस

गंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत

कधी कामात कधी गाण्यात फ़ुलताफ़ळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो

आता तारे पिकत चालले आकाश झाले निरभ्र निवळ
दुरुन जवळ झालो तसे क्षितिजदेखील आले जवळ...

बा.भ.बोरकर

Wednesday, March 11, 2009

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची कधी फ़ुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गल्बत रुपेरी
त्याचा कोश किनार्यास कधी लाभणार नाही

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

कुसुमाग्रज