Friday, February 27, 2009

हसलो म्हणजे

'हसलो' म्हणजे 'सुखात आहे' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे 'दुखले नव्हते' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही ! ...

'हसलो' म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
'हसलो' कारण शक्यच नव्हते दुसरे काही
'डोळ्यामध्ये पाणी नव्हते' ऐसे नाही !

'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

'हसलो' कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
'हसलो' कारण तुला सुद्धा ते खरे वाटते !
'हसलो' म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
'आतुन आलो होतो डवरून ऐसे नाही..

'हसलो' कारण शास्त्राची मज ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
'हसलो' कारण हिशोबास या दमलो नाही
'हसलो' कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

'हसलो' कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
'हसलो' कारण सत्याची मज भीती नाही
'हसलो' कारण फसण्याच धसका नाही . .

- नेणिवांची अक्षरे, संदीप खरे

Wednesday, February 25, 2009

धुंद होते शब्द सारे...

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द..

मेघा दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा - 2
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले .. भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे......

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे...
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या


गीत: कौस्तुभ सावरकर
चित्रपट : उत्तरायण
गायक : रविन्द्र साठे, रविन्द्र बिजूर, बेला
संगीत : अमरत्य राउत
.

Tuesday, February 24, 2009

इंदिरा संत हे नाव नुसतं आठवलं तरी एक अगदी शांत सोज्वळ कविवृत्ती साकार सामोरी येते. त्यांनी अगदी मोजकंच गद्य लिखाण केलं. पण ते गद्य हे ही एक काव्यच! त्यांच्या 'मृद्गंध' या लेख संग्रहातल्या 'अरसिक किती हा शेला ' या लेखातला उतारा : निसर्गाच असं शब्दचित्र क्वचितच कुणी चितारू शकेल. .
------------------------------­------------------------------­-----

वादळासकट गारांचा पहिला वळीव कोसळून जावा। मग त्याच्या दुसर्या दिवशी सृष्टीने जो नजराणा पुढे केलेला असतो तो बघत रहावा. दरवर्षी मी त्या दिवसाची वाट पाहात असते. त्या दिवसाचा सूर्य उगवतो तोच किती निराळा! सूर्य चांगला वर आलेला असतो. तरी तो लाल पिवळा असा, उगवत्या पूर्ण चंद्रासारखा आभाळात स्निग्धपणे तरंगत असतो. सभोवती लालसर धुक्याचे वलय असणारा आणिचांगले उजाडल्यावरही असा प्रसन्न रंगमूर्ती दिसणारा सूर्य त्याच दिवशी पहायला मिळतो.
दूर आकाशाला टेकलेला यळ्ळूर गडही जमिनीसरशी तिरपे पंख पसरून पाठमोर्या बसलेल्या राखी पक्ष्यासारखा दिसतो, आणि त्याच्या पायथ्याशी जी झाडांची लांबलचक पसरलेली गर्दी असते. तीत शुभ्र अशा सावरीच्या कापसासारखे धुके घनदाट भरुन असते. शुक्याचा तो शुभ्र लांबलचक पट्टा आणि त्यात माने-कपाळापर्यंत बुडुन गेलेली झाडे, पलीकडे मधूनच चमकणारा विजेच्या तारांचा जुडगा ... ध्यानी मनी नसताच नकळत एक ओवी ओठांवर येते.
"भरली चंद्रभागा,
झाडं बुडाली लहान थोर
सव्वालाखाचा पीतांबर,
जनी धुईते पायावर ..."
जनी दिसत नव्हती, पण चंद्रभागा दिसत होती, बुडालेली झाडेझुडे दिसत होती. आणि त्या बहुमोल पीतांबरावरील जर चमचमत होती. मग विटेवर उभे राहून जनीची निर्व्याज भक्ती बघणारा तो विठू, म्हणजे इथे काशात कोमलाहून कोमल होऊन ते नवल पाहत राहिलेला हा सूर्य तर नसेल?
पण या मनोहारी चित्रापेक्षाही, वातावरणातील झिरिमिरी धुक्याला किती बघावे असे मला झाले. माझ्या श्वासाला जाणवणारे आणि खिडकीपासून त्या चंद्रभागेपर्यंत जे धुके लहरत होते त्याची शोभा कशी वर्णन करणार? समोरच्या इमारती, माळावरून जाणारी माणसे, शेळ्या, शेतातील कुणी चालवत असलेली कुरी, शिवारातील झोपडे ... या सर्वांवर जाळीदार मोहिनी पसरणारे ते तरळ विरळ धुके हाच या दिवसाचा सृष्टीने पुढे केलेला नाजूक नजराणा होता. हे धुके कसले? झिरझिरित अशी अती तलम ओढणीच. आणि मनात आले, सकाळी सकाळी शेजघरातून बाहेर येऊन वावरणारी नववधू जशी पापण्या खाली वळवून, नणंदा-जावाच्या रोखलेल्या गमतीदार नजरा टाळते आणि ओठावरची लाली आणि डोळ्यांतील चमक दिसू नये म्हणून घुंघट पुढे ओढून घरभर लगबगीने फिरते ... तशी ही सृष्टी, अवगुंठनवती.
महावस्त्राचा एक पदत बोटांनी धरून उचलून घडी उलगडावी तसे आता होते. समोर हे जाळीदार मनोहारी दृश्य दिसत असताना, मनात निराळेच धुके दिसू लागते. आमच्या घुमटमाळावरील रस्त्यावर मी हिवाळाभर बघत असलेले. वाहत्या नदीत शुभ्र वस्त्र पसरावे आणि ते प्रवाहावरोबर पसरत असताना त्यावर वलयांच्या चुण्या उमटत याव्यात, तसे समोरुन, आजूबाजूंनी पायाशी रांगत लहरत लाटालाटांनी येणारे धुके. शेजारच्या शेतावरुन फेनिल लहरींसारखे वार्यावर झुलत येणारे धुके. ते दुरुन येऊन एकदा पायांवरुन जाईपर्यंत पाऊलच पुढे उचलता येत नाही. वाटते, थोडे मुठीत धरुन ठेवावे. पण मिळत नाही..


संग्रह: मृद्गंध
लेख: अरसिक किती हा शेला....
लेखिका: इंदिरा संत.

Friday, February 20, 2009

एकदा केंव्हा तरी

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,
आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥


-मंगेश पाडगांवकर

Thursday, February 19, 2009

आज या मैफ़ीलीत

आज या मैफ़ीलीत
काय मजा आली..
त्या एकटया चंद्राला पाहुन
चांदणी गालात हसुनी म्हणाली…

आली आहे मी इथे
तो साज चंदेरी घालुनी
आता डोळे भरुनी
तु घे मला पाहुनी..

मग घेतली त्या वेड्या चंद्राने
नजर आपली रोखुनी..
पुटपुटला तो ओठातल्या ओठात
“नाही पाहीले असे अप्रतिम सौंदर्य अजुनी !”

घायाळ झाली ती
अन लाजली ते ऎकुनी..
पुसले तीने त्याला आवर्जुन
कुठे होतास तु माझी मैफ़ील सोडुनी…

मग केला आवाज तीने
त्या छुमछुम पैणजनाचा..
इकडे वाढला होता
ठोका चंद्राच्या काळजाचा..

केली तीने सुरु
उधळण त्या सप्तसुरांची..
जाहली प्रेमळ दशा
त्या चंद्रच्या हळव्या मनाची

थिरकत होते पाय तीचे
घुमत होते नाद स्वरांचे
मग मत्रंमुग्ध जाहले होते
कान त्या चंद्राचे..

आता पेटला होते सार आसमंत
झाल्या सज्ज नर्तिका स्वर्गाच्या
न्हाउनी रंगात प्रकाश्याच्या
उजळला होते रंग मैफ़ीलीचा.

सारे विलीन होत होते..
तारेहि दिशाहीन होत होते..
आता जणु त्या मैफ़िलीने
सारयांना भाव वश केले होते..

मग मैफिलिचा रंग
मावळतीकडे अचानक वळाला..
होतच असे सारयांच्या डॊळ्यातुनी
थेंब अश्रुंचा गालावरुनी ओघळला

कारण असे काय घडले होते
त्या भावुक मैफिलित.
चक्क चंद्रच हरवला होते
त्या चांदणीच्या कुशीत

म्हणुनच कदाचीत
आजही जातो चंद्र त्या मैफिलिला
कारण नजरेस येत नाही
तो अमावसेच्या रातीला

एवढे असुनही
पोर्णिमेच्या रातीला तो एकटा असतो
चांदण्याची मैफिल मात्र
कायमचाच तर खेळ असतो…॥

-अनामिक

नेणिवेची अक्षरे

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यानमधील रक्त
ओल्या आठावनिंचे काही क्षण हवे असतात
चाकोरिला उध्वस्ताचे घन हवे असतात....

तसे काही चेहेर्यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी हसनार्यांचे हसने वेगले दिसते!
ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा
हवी असते षडाजासारखी सलग, शांत व्यथा.........

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरान्मधाल्या श्रुति
प्रेम नाही, हवी असते मला चवथी मिति!

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वथाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखल पश्चाताप!

- संदीप खरे ( नेणिवेची अक्षरे).

Wednesday, February 18, 2009

कसे सरतिल सये

कसे सरतिल सये मझ्याविना दिस तुझे सरताना आणि सांग सलतिल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुजे उरे
ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा आळीमीळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना
गुलाबाची फूल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

कोण तुझ्या सौदातून उभे असे सामसूम
चिडिचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलचं आणि पुन्हा छळेलचं
नभातुन गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आसवांचे ओले सण
रोज रोज निजभर भरतिल ना
गुलाबाची फूल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर काचभर तडा
तूच तूच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा
पड़े माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ..

आता नाही बोलायचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देह्भर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झूले
जरा घन झरू देना वारा गुदमरुदेना
तेव्हा नभ धरा सारी भिजविल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल न भरतिल ना ॥

-संदीप खरे.