Tuesday, June 19, 2012

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी

काय बोलले न कळे, तू समजून घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी

दुःख नको सुटताना, अश्रू नको वळताना
मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी

साक्ष लाख तार्‍यांची, स्तब्ध अचल वार्‍याची
ज्योत बनून जळले रे, मी तुझ्या पथावरी
 
- मंगेश पाडगावकरगायिका : सुमन कल्याणपूरकर  

भेट तुझी माझी स्मरते

भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची
 
- मंगेश पाडगावकरसंगीत : यशवंत देव 
गायक : अरुण दाते  

सावर रे..

सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला

आता आभाळ भेटले रे, अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती, श्वास माझे मला

फांदी झोक्याने हालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला

जुने आधार तुटले रे, तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या, वेडया तुझ्या फुला
 
- मंगेश पाडगावकरगायिका : लता मंगेशकर 
संगीत : हृदयनाथ मंगेशकर  

जेव्हा तुझ्या बटांना ..

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा

मंगेश पाडगावकर
गायक : सुरेश वाडकर
संगीत : श्रीनिवास खळे 

चांदण्यात झुलतो

चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा 
गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा 
पीस मयूरी अलगद हे या हृदयातूनी
पहिली प्रीती साद घालिते या गाण्यातूनी 

निळावल्या स्वप्नांचा मोर नाचरा 
मोहरल्या वाटा आता, मंतरली राने 
हुरहुरल्या शपथा येथे, झुरमुरली पाने 
अधरांचा, स्पर्शांचा, भास बावरा 

तळहातावर भिजली मेंदी, स्वप्न होऊनी 
ओठांवरती रुजले गाणे जन्म होऊनी 
ध्यासांचा, भासांचा गोड भोवरा

- प्रविण दवणे
गायिका : अनुराधा पौडवाल
संगीतकार : श्रीधर फडके

घर थकलेले सन्यासी

घर थकलेले सन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळयामधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झर्‍याचे पाणी

मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई
 
- कवी ग्रेस 
गायक : पं.हृदयनाथ मंगेशकर 
संगीत : पं.हृदयनाथ मंगेशकर 
चित्रपट : निवडुंग 

ती गेली .. तेव्हा

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
 
- कवी ग्रेस 
गायक : पं.हृदयनाथ मंगेशकर 
संगीत : पं.हृदयनाथ मंगेशकर 
चित्रपट : निवडुंग