Tuesday, November 15, 2011

अहि नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !
कधी लवचिक पाते खड्गाचें लवलवते,कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.
मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.
चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.
वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.
चालला पुढे तो लचकत मुरडत मान,अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !
हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,रे नकूल आला ! आला देख, नकूल !
थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.
पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !
रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !
क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।
संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,पिंजून कापसापरी पडे तो नाग,ते खंड गिळाया जमले कीटक भोती !
- कुसुमाग्रज

Monday, August 8, 2011

जालियनवाला बाग

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !”आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !
 - कुसुमाग्रज

Wednesday, March 30, 2011

असा दरवळे मी

असा दरवळे मी तुझ्या भोवताली 
लपेटून साऱ्या तुझ्या हालचाली 
असा दरवळे मी तुझ्या भोवताली २

तुझा चेहरा झगमगे अंतरीया २
जसा चांदवा अंबराच्या महाली  २ 
लपेटून साऱ्या तुझ्या हालचाली 
असा दरवळे मी तुझ्या भोवताली २ 

जरा धीर आला तिच्या बोलण्याने ३
तिची लाज माझी धिटाई निघाली २ 
लपेटून साऱ्या तुझ्या हालचाली 
असा दरवळे मी तुझ्या भोवताली २ 

नवे सूर त्यांनी दिले पावसाला ३
तिची पैंजणे ज्या सरींना मिळाली २ 
लपेटून साऱ्या तुझ्या हालचाली 
असा दरवळे मी तुझ्या भोवताली २ 

गीत : अवधूत गुप्ते 
संगीत : मयुरेश पै 

Thursday, January 13, 2011

तुझं माझं घर

तुझं माझं घर...एक झोका
कधी निळ्याशा ढगांत,
कधी पाचूच्या बनात.
तुझं माझं घर.... एक फुलबाग
कधी प्राजक्ती सडा
कधी धुंद केवडा.
तुझं माझं घर ... एक चांदणं
कधी टिपूर टिपूर
कधी गंधाळ आतूर.
तुझं माझं घर... एक पाऊस
कधी झिम्माड झिम्माड
कधी कोसळ द्वाड.
तुझं माझं घर.... एक मैफिल
कधी तुझिया सुरात
कधी माझिया तालात.
तुझं माझं घर ... एक देव्हारा
शांत समई प्रकाश
पराकोटीचा विश्वास
-जयश्री अंबासकर

Thursday, January 6, 2011

हाक

 गूढ निळी घनराई,
अन टपोर चंद्रमा वरी,
घालीत मी हाका तुला
तू नाही जवळी तरी

गूढ निळी मनराई;
हाक तुला आत आत,
तुज साठी रात्र जळे
डोळ्यातील बाहुल्यांत.

हाकेवर चंद्र असा,
हाकेवर रात्र अशी,
नसून तू जवळ कशी,
डोळ्यावर पापणीशी!

- मंगेश पाडगावकर
०५/०७/१९६५

संवाद

उन्हे ओली
सांज भोळी
डोळे डोळ्यांचे मागणे

कळलेले
जुळलेले
मौन फुलांचे सांगणे

नभ भोर
चंद्रकोर
जळी आभाळ वाहते

कुणी तरी
कुठे तरी
उगी जीवास भावते

-मंगेश पाडगावकर
२६.२.१९७१