Tuesday, June 26, 2012

त्या फुलांच्या गंधकोषी


त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?

जीवनी संजिवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?

- सुर्यकांत  खांडेकर 
संगीत / गायक : हृदयनाथ  मंगेशकर.
गाणे येथे ऐका ..

Tuesday, June 19, 2012

पूर्वरंग (जपान)

त्या रात्री जपानी खाणावळ म्हणजे काय ते मी प्रथम पाहिले. जपानी भाषेत तसल्या खाणावळींना ऱ्योकान  (Ryokan) म्हणतात. एका टुमदार लाकडी घरात आम्ही शिरलो. दारातच पाचसहा बायका आमच्या स्वागताला उभ्या होत्या. त्यांनी कमरेत वाकूनवाकून आमचे जपानी स्वागत केले. त्यांच्यापैकी एकीने चटकन पुढे होऊन माझ्या बुटांचे बंद सोडवले आणी सपाता दिल्या. मग दुसरीने त्या लाकडी घरातल्या भुलभुलैयासारख्या ओसऱ्यांमधून एका चौकटीपुढे उभे केले. तिसरीने चौकट सरकवली. आत जपानी दिवाणखाणा होता. सुंदर ततामी पसरलेल्या. मध्यावरच एक काळाभोर लाकडी चौरंग मांडला होता. बसायला भोवताली पातळ उशा होत्या. कोपऱ्यात तोकोनोमा. तिथे सुंदर पुष्परचना. आम्ही चटयांवर मांड्या घालून बसलो. त्या खाणावळीणबाईंनी माझा कोट काढला. इतक्यात बांबूच्या, होडीच्या आकाराच्या छोट्या छोट्या ट्रेजमधून सुगंधीत पाण्याने भिजलेले टॉवेल घेऊन एक बाई आली. तिने माझे तोंड पुसण्यापूर्वी मीच चटकन तोंड पुसून टाकले. आणि दिवसभर चालून अंग आंबले होते म्हणून बसल्या बसल्या जरासे हातपाय ताणले. लगेच त्या जपानी दासीने माझे खांदे चेपायला सुरूवात केली. आमचे कुटुंब जरासे चपापले. मीही नाही म्हटले तरी गोरामोराच झालो. (माझ्या अंगभूत वर्णाला जितके गोरेमोरे होता येईल तितकाच!) काय बोलावे ते कळेना. एकीलाही जपानीखेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ! त्या खाणावळीत उत्तम चिनी जेवण मिळत होते, याची खात्री करूनच तिथे गेलो होतो. पण हे आतिथ्य कसे आवरावे ते कळेना.
त्या बाया मधूनच पाय चेपायच्या. सिगरेट काढीपर्यंत काडी पेटवून धरायच्या. द्वारकाधीशाच्या अंतःपुरात सुदामदेवाचे त्या बायांनी कसे हाल केले असतील ह्याची कल्पना आली. तरी सुदामदेव तिथे एकटाच गेला होता. मी ह्या स्त्रिराज्यात सहकुटुंब सापडलो होतो. हळूहळू खाद्यपदार्थ आले. "साके"चे(साके : जपान मधील तांदळापासून बनवलेले मद्य ) पेले भरले. जेवणातल्या तीनचार कोर्सेसनंतर एका परिचारीकेने हळूच समोरची ती चौकटीचौकटीची भिंत सरकवली आणि पुढले दृश्य पाहून माझा घास हातातच राहिला. पुन्हा एकदा सौंदर्याचा अनपेक्षित धक्का देण्याचा जपानी स्वभावाचा प्रत्यय आला. समोर एक चिमुकले दगडी उद्यान होते. त्यातून एक चिमणा झरा खळखळत होता. पलीकडून पुलासारखी गॅलरी गेली होती. बहालावर ओळीने जपानी आकाशकंदिलासारखे दिवे टांगले होते. त्यांच्या मंद प्रकाशात तो झरा चमकत होता. आणि सतारीचा झाला वाजावा तसा स्वर चालला होता. पलिकडून कुठूनतरी सामिसेनवर गीत वाजत होते. (सुदैवाने कोणी गात मात्र नव्हते.) चौरंगावर चिनी सुरस सुरसुधा रांधियली होती. त्या दृश्याला स्वरांची आणि जपानीणबाई बाई लडिवाळपणा करीत होत्या. क्योटोतल्या त्या जपानी खाणावळीतली रात्र बोरकरांच्या जपानी रमलाच्या रात्रीची याद `जंबिया मधाचा मारि काळजात!' रियोकान सोडताना त्या दासीने पुन्हा बूटाचे बंद बांधले. आणि सगळ्याजणींचा ताफा रांगेत उभा राहून दहा दहा वेळा वाकून म्हणाला "सायोना~~रा------सायोना~~रा---!" छे! जपानी बायकांचा सायोनारा छातीचे ठोके थांबवतो!

(जपान मधल्या वास्तव्यात पाहिलेल्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.. अजूनही - 2012 सालातही जपान मध्ये सर्वत्र (प्रत्येका शहरांमधल्या राखीव भागात ) अशीच घरे आणि बागा बघायला मिळतात.. )

-पु ल देशपांडे . 
(पूर्वरंग)

"टु बी फ्री"

जे कृष्णमुर्ती यांच्या "टु बी फ्री" या इंग्रजी उतार्‍याचे भाषांतर 

मुक्त (फ्री) होण्यासाठी आपल्याला आपल्याच आत असणार्‍या सगळ्या परावलंबित्वावर (डीपेन्डन्सी) मात करावी लागेल. जर आपल्याला हेच समजलं नाही की आपण असे इतरांवर अवलंबुन का आहोत तर आपण आपल्या परावलंबित्वावर मात करू शकणार नाही. आपल्या मुक्तीचा मार्ग हा आपण परावलंबी (डीपेन्डट) का आहोत हे समजलं तरच उघडेल नाहीतर आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. पण मुक्ती म्हणजे काही फक्त एक प्रतिक्रीया नाही. पण प्रतिक्रीया म्हणजे काय? जर मी काही तुम्हाला लागेल असं बोललो म्हणजे तुम्हाला नावं ठेवली तर तुम्ही माझ्यावर चिडाल. हे चिडणं म्हणजे प्रतिक्रीया की जी परावलंबित्वातुन जन्मलेली आहे. स्वातंत्र्य (इंडीपेन्डन्स) ही अजुन एक प्रतिक्रीया झाली. पण मुक्ती ही काही प्रतिक्रीया नाही. म्हणूनच जोपर्यंत आपल्याला प्रतिक्रीया म्हणजे नक्की काय हे समजत नाही आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत आपण कधीच मुक्त होणार नाही.
     एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? एखाद्या झाडावर प्रेम करणं किंवा एखाद्या पाळीव प्राण्यावर प्रेम करणं किंवा एखाद्या पक्ष्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? जरी ते झाड तुम्हाला सावली, फळं असं काहीच देणार नसलं तरी ते तुमच्यावर अवलंबुन नसलं तरी सुद्धा तुम्ही त्या झाडाची, त्या पाळीव प्राण्याची किंवा पक्ष्याची तुम्ही काळजी घेता, त्याला खाऊ-पिऊ घालता, त्याची नीगा राखता. यालाच प्रेम असं म्हणतात. आपण असं निरपेक्ष प्रेम कधीच करत नाही. आपल्यापैकी कित्येकांना हे असं प्रेम म्हणजे नक्की काय हेच माहीत नसतं. कारण आपलं प्रेम हे मुख्यत: राग, लोभ, मोह, मद, मत्सर, भिती यांच्याशी निगडीत असतं. यामुळेच आपण आपल्या आतून प्रेम करून घेण्यावर पराकोटीचे अवलंबुन असतो. आपण फक्त प्रेम करून तिथेच सोडून देत नाही पण परतफेडीची अपेक्षा करतो आणि या अपेक्षेमुळेच आपण परावलंबी बनतो.
      म्हणून मुक्ती आणि प्रेम हे हातातहात घालून जातात. प्रेम ही काही प्रतिक्रीया नाही. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी तुमच्यावर प्रेम केलं तर तो एक केवळ व्यापार होईल, एक अशे गोष्ट की जी बाजारात खरेदी केली जाते. ते प्रेम नव्हे. प्रेम करणं म्हणजे त्याबदल्यात काही मागणं नव्हे. अगदी असं वाटणं सुद्धा चुकीचं आहे की तुम्ही काहीतरी देता आहात. अशाच प्रकारच्या निरपेक्ष प्रेमाला मुक्ती जाणून घेता येते. पण आपल्याला यासाठी शिक्षण मिळतच नाही. आपल्याला गणित, रसायनशास्र, भूगोल, इतिहास याचं शिक्षण मिळतं आणि तिथेच ते थांबतं देखिल. कारण तुमच्या पालकांची काळजी ही फक्त तुम्हाला चांगली नोकरी मिळणे आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी होणे यासाठीच असते. जर त्यांच्याकडे पैसा असेल तर ते तुम्हाला परदेशात पाठवतील, पण सगळ्या जगासारखाच त्यांचाही हेतू हाच असतो की तुम्ही श्रीमंत बनावं, तुम्हाला समाजात एक मानाचं स्थान असावं; जेवढं वर तुम्ही जाल तेवढे जास्त तुम्ही इतरांच्या दु:खासाठी कारण बनता. कारण त्याठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला इतरांशी स्पर्धा करावी लागते, अगदी निर्दयी व्हावं लागतं. पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवतात की जिथे महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा आहे पण प्रेम आजीबात नाही. आणि म्हणूनच आपल्यासारखा समाज सतत संघर्षात आणि गोंधळलेल्या अवस्थेत जातो आहे. म्हणूनच आपल्या देशातील राजकिय नेते मंडळी, न्यायमूर्ती आणि तथाकथित आदरणीय विद्वान जरी सतत शांततेच्या गप्पा करत असले तरी त्या शब्दाला फारसा अर्थ प्राप्त होत नाही.

Internet  वरून साभार.

मराठ्या उचल तुझी तलवार

"मराठ्या"
मराठ्या उचल तुझी तलवार
एकिची उचल तुझी तलवार
शपथ तुलाआइच्या दुधाची
घेउ नको माघार, मराठ्या....
शपथ तुलाशिवछत्रपतींची
चळचळ कापत अवनी सारी
काय विसरली दिल्ली तुझिया
तलवारीची धार, मराठ्या....
दाहिदिशांना तुडवित होत्या
तुझ्याच घोड्यांच्या रे टापा
अवघा भारत पहात होती
गड्यातुझा वाघासम छापा
तुझी जात मर्दाची मर्दा
कर शेवटचा वार, मराठ्या....
आता दाखव तराजूस तू
अपुल्या तलवारीचे पाणी
सांग विकत का घेतिल तुजला
बनियाच्या थैलितिल नाणी
भीक कशाला घे हक्काने
तुझेच तू भांडार, मराठ्या.....
कमनशिबाने तुझे पुढारी
बाजिराव पळपुटे निघाले
नव्याच बाळाजीपंताने
निशाण चोरांचे फडकवले
अशा पिसाळा उडवाया कर
ऐक्याचा निर्धार, मराठ्या.....
स्वर्गामधल्या पुण्यात्माचे
तुजवर मर्दा खिळले डोळे
आणिक टपून बसले दुष्मन
तुझे पुरे करण्या वाटोळे
जिंकलास तर अखिल विश्व तव
करील जयजयकार, मराठ्या.....
सुरेश भट
. बाजीराव दुसरा. ह्याने शनिवारवाड्यावर युनियन जॅकचे निशाण फडकावले
. बाळाजीपंत नातू.
. सूर्याजी पिसाळ. मराठ्यांचा फितूर सरदार.
 ---
आचार्य अत्रे यांच्या 'दैनिक मराठा'च्या पहिल्या अंकात (१५ नोव्हेंबर १९५६) मुखपृष्ठावर माझा भाऊ सुरेश ह्याची 'मराठ्या उचल तुझी तलवार' ही कविता छापण्यात आली होती. तेव्हा तो २४ वर्षाचा होता. 'दैनिक मराठा' हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुखपत्र होते. सर्वाधिक खपाचा विक्रम या दैनिकाच्या नावावर होता. महाराष्ट्राच्या निर्मितीत 'दैनिक मराठी'चा फार मोठा सहभाग होता. 'कऱहेचे पाणी' या आपल्या आत्मचरित्रात वर या कवितेची तीन कडवी प्रकाशित झालेली आहेत. आचार्य अत्र्यांनी, उदयोन्मुख तरुण, प्रतिभावान कवी, असे सुरेशचे वर्णन केले आहे. ही कविता मला शिरीष पै ह्यांचेकडेही मिळाली नाही. हे गीत श्री. मधुकर झेंडे, ग्रंथपाल, सावर्जनिक वाचनालय, नासिक ह्यांनी प्रेमाने पाठवले.
दिलीप श्रीधर भट

आकाश उजळले होते

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.

    
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
     मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते.

    
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
     मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते.

    
याचेच रडू आले की जमले मला रडणेही
     मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते.
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

     मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
     मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.
सुरेश भट

मग माझा जीव...

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!
विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!
सहज कधी तू घरात लावशील सांजवात;माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!
जेव्हा तू नाहशील,दर्पणात पाहशील,माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

                    
-सुरेश भट

उशीर

हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
केले बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!
आला गंध त्यांना केव्हाच चंदनाचा..सारे उगाळलेले ते कोळसेच होते!
तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!
होती ती दयाही.. ती जाहिरात होती!जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.मातीत पावलांचे काही ठसेच होते!
-सुरेश  भट