Saturday, January 31, 2009

जिप्सी

एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

आठवतें बालपण जेव्हां होतों मी खेळत
होतों बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौलें पानांचीं घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवतें अजूनहि होतों रंगत मी किती !
पण अकस्मात होतों जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

शाळेंतले ते दिवस पाटी-पुस्तक हातांत
टोपी जरीची सुंदर … स्वारी निघाली थाटांत
जाड काचेची चाळिशी लावूनिया डोळ्यांवर
होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतींच्या जगांत
उडे खिडकीमधून दूरदूरच्या ढगांत
झाडें पानांच्या हातांनीं होतीं मला बोलवीत
शेपटीच्या झुबक्यानें खार होती खुणवीत
कसें अवरावें मन ? गेलॊं पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

आणि पुढें कशासाठीं गेलॊ घर मी सोडून !
सारीं सारीं सुखे होतीं, काही नव्हतेंच न्य़ून
पण खोल खोल मनीं कूणी तरी होतें द:खी
अशा सुखांत असून जिप्सी उरला असुखी
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढें खळखळणार्या लाटा …
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

कधीं कधीं पहाटते उरीं आगळी प्रतीती
जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपतें चित्तीं
जाचूं लागते जिप्सीला द्न्यात विश्वाची चौकट
आणि जाणवतें काहीं गूढ … अंधुक … पुसट !
खेळ सांडिलेला सारा पुन्हा उधळाया सजे
आपणच निर्मिलेलें आपणच मोडूं धजे
गुढ अद्न्यात धुक्यांत आणि जातसे बुडून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

घर असूनहि आतां घर उरलेलें नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावें ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

(जिप्सी) -मंगेश पाडगांवकर


No comments:

Post a Comment