Monday, April 6, 2009

एका तळ्यात होती


एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे 
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे 
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक 
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? 
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक 
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले 
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले 
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक 
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक


Friday, April 3, 2009

मन उधाण वाऱ्याचे


मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते…

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहूरत्या सांजेला कधी एकटेच झुरते..
सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते…
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते..
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते………… …..

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते…

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागून पळते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते…………