इंदिरा संत हे नाव नुसतं आठवलं तरी एक अगदी शांत सोज्वळ कविवृत्ती साकार सामोरी येते. त्यांनी अगदी मोजकंच गद्य लिखाण केलं. पण ते गद्य हे ही एक काव्यच! त्यांच्या 'मृद्गंध' या लेख संग्रहातल्या 'अरसिक किती हा शेला ' या लेखातला उतारा : निसर्गाच असं शब्दचित्र क्वचितच कुणी चितारू शकेल. .
-----------------------------------------------------------------
वादळासकट गारांचा पहिला वळीव कोसळून जावा। मग त्याच्या दुसर्या दिवशी सृष्टीने जो नजराणा पुढे केलेला असतो तो बघत रहावा. दरवर्षी मी त्या दिवसाची वाट पाहात असते. त्या दिवसाचा सूर्य उगवतो तोच किती निराळा! सूर्य चांगला वर आलेला असतो. तरी तो लाल पिवळा असा, उगवत्या पूर्ण चंद्रासारखा आभाळात स्निग्धपणे तरंगत असतो. सभोवती लालसर धुक्याचे वलय असणारा आणिचांगले उजाडल्यावरही असा प्रसन्न रंगमूर्ती दिसणारा सूर्य त्याच दिवशी पहायला मिळतो.
दूर आकाशाला टेकलेला यळ्ळूर गडही जमिनीसरशी तिरपे पंख पसरून पाठमोर्या बसलेल्या राखी पक्ष्यासारखा दिसतो, आणि त्याच्या पायथ्याशी जी झाडांची लांबलचक पसरलेली गर्दी असते. तीत शुभ्र अशा सावरीच्या कापसासारखे धुके घनदाट भरुन असते. शुक्याचा तो शुभ्र लांबलचक पट्टा आणि त्यात माने-कपाळापर्यंत बुडुन गेलेली झाडे, पलीकडे मधूनच चमकणारा विजेच्या तारांचा जुडगा ... ध्यानी मनी नसताच नकळत एक ओवी ओठांवर येते.
"भरली चंद्रभागा,
झाडं बुडाली लहान थोर
सव्वालाखाचा पीतांबर,
जनी धुईते पायावर ..."
जनी दिसत नव्हती, पण चंद्रभागा दिसत होती, बुडालेली झाडेझुडे दिसत होती. आणि त्या बहुमोल पीतांबरावरील जर चमचमत होती. मग विटेवर उभे राहून जनीची निर्व्याज भक्ती बघणारा तो विठू, म्हणजे इथे काशात कोमलाहून कोमल होऊन ते नवल पाहत राहिलेला हा सूर्य तर नसेल?
पण या मनोहारी चित्रापेक्षाही, वातावरणातील झिरिमिरी धुक्याला किती बघावे असे मला झाले. माझ्या श्वासाला जाणवणारे आणि खिडकीपासून त्या चंद्रभागेपर्यंत जे धुके लहरत होते त्याची शोभा कशी वर्णन करणार? समोरच्या इमारती, माळावरून जाणारी माणसे, शेळ्या, शेतातील कुणी चालवत असलेली कुरी, शिवारातील झोपडे ... या सर्वांवर जाळीदार मोहिनी पसरणारे ते तरळ विरळ धुके हाच या दिवसाचा सृष्टीने पुढे केलेला नाजूक नजराणा होता. हे धुके कसले? झिरझिरित अशी अती तलम ओढणीच. आणि मनात आले, सकाळी सकाळी शेजघरातून बाहेर येऊन वावरणारी नववधू जशी पापण्या खाली वळवून, नणंदा-जावाच्या रोखलेल्या गमतीदार नजरा टाळते आणि ओठावरची लाली आणि डोळ्यांतील चमक दिसू नये म्हणून घुंघट पुढे ओढून घरभर लगबगीने फिरते ... तशी ही सृष्टी, अवगुंठनवती.
महावस्त्राचा एक पदत बोटांनी धरून उचलून घडी उलगडावी तसे आता होते. समोर हे जाळीदार मनोहारी दृश्य दिसत असताना, मनात निराळेच धुके दिसू लागते. आमच्या घुमटमाळावरील रस्त्यावर मी हिवाळाभर बघत असलेले. वाहत्या नदीत शुभ्र वस्त्र पसरावे आणि ते प्रवाहावरोबर पसरत असताना त्यावर वलयांच्या चुण्या उमटत याव्यात, तसे समोरुन, आजूबाजूंनी पायाशी रांगत लहरत लाटालाटांनी येणारे धुके. शेजारच्या शेतावरुन फेनिल लहरींसारखे वार्यावर झुलत येणारे धुके. ते दुरुन येऊन एकदा पायांवरुन जाईपर्यंत पाऊलच पुढे उचलता येत नाही. वाटते, थोडे मुठीत धरुन ठेवावे. पण मिळत नाही..
संग्रह: मृद्गंध
लेख: अरसिक किती हा शेला....
लेखिका: इंदिरा संत.
Tuesday, February 24, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment