Thursday, March 19, 2009

फोटोतली तरुणी

माज्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा माला म्हणाली
"मला चा़गलेसे स्थळ शोधून द्या ना..."
"इथे माजा जीव टा़़गल्या सारख वाटतय .."


- पु.ल.देशपांडे

प्रश्न


आताशा बुडणाऱ्या सुर्याला
"बरय उद्या भेटू "
अस म्हणालो की
मला म्हणतो ,
कशावरून
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे? "

सूर्य आता म्हातारा झालाय.


- पु.ल.देशपांडे

Wednesday, March 18, 2009

कणा


'ओळखलत का सर मला'
--पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी।
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून:
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भींतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली--
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे उरले--
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे.चिखलगाळ काढतो आहे.'-
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला--
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

Thursday, March 12, 2009

प्रीतीची वाट नेहमीच जात असते अथांग जळातून
वाळूवरच्या पावलांनी तिचा माग लागत नसतो..

पण एकेक पापुद्रा निघत जातो.. तसतसे त्या रेशमी नात्यातील पदर उलगडत जातात.. यात 'मी' पणाचेही बंधन कधीतरी गळून पडते.....

जवळपणात होतो दूर आता दुरून झालो जवळ
म्हणू नकोस जाणूनबुजून मीच माया केली पातळ

तशी आठवण येत नाही भेटीचीही काय जरूर ?
सूर वाहे ऊर भरुन घरांत देखील चांदणे टिपूर

इतके दिवस हसत रुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळते खोल खोल माझ्याच दॄष्टीत मिटली आहेस

गंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत

कधी कामात कधी गाण्यात फ़ुलताफ़ळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो

आता तारे पिकत चालले आकाश झाले निरभ्र निवळ
दुरुन जवळ झालो तसे क्षितिजदेखील आले जवळ...

बा.भ.बोरकर

Wednesday, March 11, 2009

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची कधी फ़ुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गल्बत रुपेरी
त्याचा कोश किनार्यास कधी लाभणार नाही

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

कुसुमाग्रज

Monday, March 2, 2009

शरदागम

आभाळ निळें नि ढग पांढरे हवेंत आलेला थोडा गारवा
कोवळी सकाळ मनमोकळी धरातळी रंग एक हिरवा

साचून राहिल्या गढूळ पाण्याची हळुहळुं झालीं निर्मळ जळें
काठावर उभ्या राहून बाभळी वाकून पाहती रूप सावळे

टवटवलेली सारींच शेतें; ज्वारीच्या कुसेत अधीर होत
टपोर गर्भ तान्ह्या कणसाचा पान-आडोशात जन्मास येत

काळजी करते काळी माती कशी अजून कपाशी नाही फुलली
चौकशी कराया पंख हलवीत निळे तास पक्षी उतरती खाली

शेवंतीला कुणी उगीच सांगे, इतक्यांत तुझी वेळ आली नाही
गवताचे सोने होण्याआधीच पिवळ्या फुलांची नको करूं घाई!

- अनिल
फ़िटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखो-यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश !
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे
जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास..

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास..

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास... .

गीत : सुधीर मोघे.
चित्रपट : लक्ष्मीची पाऊले .
संगीत : श्रीधर फडके .
गायक : सुधीर फ़डके अणि आशा भ्रोसले .

(शेवटचे कड्वे द्वंद्वगीतात वगळले आहे... नंतर श्रीधर फडकेंनी 'फ़िटे अंधाराचे जाळे' या अल्बममध्ये हे स्वत: गायले आहे).

डोळ्यात कशाला पाणी

आकाशात फ़ुललेली
मातीतील एक कहाणी
जो प्रवास सुंदर होता
आधार मातीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आकाश माथ्यावरती
सुख आम्रासवे मोहरले
भोवताल सुगंधी झाले
शून्यामधली यात्रा
वा-यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यात कशाला पाणी..

- कुसुमाग्रज

Sunday, March 1, 2009

नास्तिक

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !


एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे
देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो..............
- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

अगदीच काही नसण्यापेक्षा

या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो । । .
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन . . .
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन . . .
येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
" बरं झालं हे झाड आलं !
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील . . .
माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन . . .
त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -
" बरं झालं हे झाड आलं !
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

माझ्या अंगाखांद्यांवर
आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील . . .
त्यांची वसंतांची गाणी
उडत माझ्या कानी येतील . . .
ती म्हणतील -
" बरं झालं हे झाड आलं . . .
नाहीतर सगळा रखरखाटच होता !
याच जागी आपल्या मागे लागलेला
तो वेडा कवी कुठे गेला ?"
मी पानं सळ्सळ्वत कुजबुजीन -
" बरं झालं मी झाड झालो . . .
वेडा कवी होण्यापेक्षा

आणखी काही वर्षांनी
मी सापडतच नसल्याचा शोध
कदाचित, कुणाला तरी लगेलही . . .
एखाद्या बेवारस, कुठल्याही
पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे
ते माझ्या नावाने अश्रु ढळतील . . .
माझी वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल . . .
आणी . . .

माझ्या चितेच्या लाकडांसाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता ते म्हणतील -
" बरं झालं हे झाड इथे आलं
अगदीच लांब जाण्यापेक्षा . . ."

माझ्यावरती ' कोणी मी '
जळून राख बनताना
धूर सोडत म्हणेन -
" बरं झालं मी झाड झालो
अगदीच कुजून मरण्यापेक्षा . . . . . . . . . . . . "
- मौनाची भाषांतरे, संदिप खरे