Thursday, January 13, 2011

तुझं माझं घर

तुझं माझं घर...एक झोका
कधी निळ्याशा ढगांत,
कधी पाचूच्या बनात.
तुझं माझं घर.... एक फुलबाग
कधी प्राजक्ती सडा
कधी धुंद केवडा.
तुझं माझं घर ... एक चांदणं
कधी टिपूर टिपूर
कधी गंधाळ आतूर.
तुझं माझं घर... एक पाऊस
कधी झिम्माड झिम्माड
कधी कोसळ द्वाड.
तुझं माझं घर.... एक मैफिल
कधी तुझिया सुरात
कधी माझिया तालात.
तुझं माझं घर ... एक देव्हारा
शांत समई प्रकाश
पराकोटीचा विश्वास
-जयश्री अंबासकर

Thursday, January 6, 2011

हाक

 गूढ निळी घनराई,
अन टपोर चंद्रमा वरी,
घालीत मी हाका तुला
तू नाही जवळी तरी

गूढ निळी मनराई;
हाक तुला आत आत,
तुज साठी रात्र जळे
डोळ्यातील बाहुल्यांत.

हाकेवर चंद्र असा,
हाकेवर रात्र अशी,
नसून तू जवळ कशी,
डोळ्यावर पापणीशी!

- मंगेश पाडगावकर
०५/०७/१९६५

संवाद

उन्हे ओली
सांज भोळी
डोळे डोळ्यांचे मागणे

कळलेले
जुळलेले
मौन फुलांचे सांगणे

नभ भोर
चंद्रकोर
जळी आभाळ वाहते

कुणी तरी
कुठे तरी
उगी जीवास भावते

-मंगेश पाडगावकर
२६.२.१९७१