Saturday, November 6, 2010

राहिले रे अजून श्वास किती

राहिले रे अजून श्वास किती जीवना,ही तुझी मिजास किती
आजची रात्र खिन्न ताऱ्यांची
आजचा चंद्रही उदास किती ?
मी कसे शब्द थोपवू माझे?हिंडती सूर आसपास किती
दुःख माझे.. विरंगुळा त्यांचा
मी करावे खुळे कयास किती?
ओळखीचे कुणीतरी गेले..ओळखीचा इथे सुवास किती
हे कसे प्रेम? या कशा आशा?मी जपावे अजून भास किती?
सोबतीला जरी तुझी छाया..मी करू पांगळा प्रवास किती
-सुरेश भट

स्वप्नाची समाप्ती

स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा 
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा.
स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशांत
खिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरांत.
काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.
रातपाखरांचा आर्त
नाद नच कानीं पडे
संपवुनी भावगीत
झोंपलेले रातकिडे.
पहांटचे गार वारे
चोरट्यानें जगावर
येती, पाय वाजतात
वाळलेल्या पानांवर.
शांति आणि विषण्णता
दाटलेली दिशांतुन
गजबज गर्जवील
जग घटकेनें दोन !
जमूं लागलेले दंव
गवताच्या पातीवर
भासतें भू तारकांच्या
आसवांनीं ओलसर.
काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांद्ण्यांचे हा
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत
प्राजक्ताच्या पावलाशीं
पडे दूर पुष्प-रास
वार्यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास.
ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधीं पूर्ती
वेड्यापरी पूजतों या
आम्ही भंगणार्या मूर्ती
खळ्यामध्यें बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यांतील घुंगरांचा
नाद कानीं येऊं लागे.
आकृतींना दूरच्या त्या
येऊं लागे रूप-रङ्ग
हालचाल कुजबूज
होऊं लागे जागोजाग.
काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांद्ण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.
होते म्हणूं स्वप्न एक
एक रात्र पाहिलेलें
होतें म्हणूं वेड एक
एक रात्र राहिलेले.
प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर.
ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडांत दिसूं वेडे
आणि ठरूं अपराधी.
- कुसुमाग्रज

Monday, August 23, 2010

कुणीतरी आठवण काढतंय

कुणीतरी आठवण काढतंय

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही"

-अनामिक

Thursday, April 22, 2010

आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ,
दई ठेवूनि ते कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
तयाची टिक टिक चालते न कधीही , आहे मुके वाटते ,
किल्ली दई न तयास ती कधी, तरी ते सारखे चालते

" अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे राती बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कु ठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनीया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
"आली ओटीवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानी तो घणघणा घंटा ध्वनी आदळे.

खेळाचया अगदी भरांत गढुनी जाता आम्ही अंगणी
हो केव्हा तीनसांजा ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले "खेळ पुरे , घरातं परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसु जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात की रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार- तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला तयातुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले ?
गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो ! तरी ना मिळे !