Sunday, May 24, 2009

मी तिच्याशी अबोला धरतो तेव्हा...


निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
आता येईल फोन तिचा ’बोलत का नाहीस?
एसेमेसला माझ्या उत्तर पाठवत का नाहीस?
तुझं गाणं तुझे शब्द वेडं करतात मला!
झालं गेलं विसर आणि सोड ना अबोला!’
काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिची बडबड
तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड
मीही तिच्यात गुंतलो होतो आता कळ्तं मला
तिचं नसणं कण कण जाळत असतं मला
तिलासुध्दा तिथे आता हाच विचार स्मरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
अन एकाएकी लागेल उचकी येईल तिचा फोन
मी सुध्दा हॅलो म्हणेन विसरून माझं मौन
तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले
’का रे छळ्तोस असा माझे श्वास थांबलेले’
दोघांमधलं अंतर आता वारयासारखं सरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
-प्रसाद कुलकर्णी

Monday, May 4, 2009

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
रचना - संत बहिणाबाई चौधरी
संगीत - वसंत पवार
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - मानिनी (१९६१)